•   Thursday, August 28
लाईफस्टाईल

उन्हाळ्यात तुमची गाडीही घेऊ शकते पेट, 'या' गोष्टींची काळजी घ्या नाहीतर पडेल महाग

उन्हाळा सुरू झाल्याने देशभरात वाहनांना आग लागण्याच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. दररोज विविध कंपन्यांच्या कारमध्ये आग लागल्याच्या घटना समोर येत असतात. लेटेस्ट एसयूव्हींना आग लागल्याच्या घटनाही समोर येत असतात. अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात चालत्या वाहनांना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. चालत्या गाडीला आग लागल्याच्या घटना घडल्यामुळे अनेकदा अपघातही होऊ शकतात. अनेकदा आधीच गाडीतून धुर येऊ लागल्याने लोकं सावध होऊन गाडीतून बाहेर पडतात. पण हायवेला गाडीने पेट घेतला तर अधिक अडचणी येऊ शकतात, अपघात होण्याची शक्यताही खूप असते. कार पेट घेण्याची बरीच असतात यातील एक कारण म्हणजे इंजिन जास्त तापणं किंवा जास्त गरम होणं हे महत्त्वाचं कारण आहे. चला तर या कारणांसह कोणती काळजी घ्यावी लागेल याबद्दल जाणून घेऊ...


वाहनाला आग लागण्याची अनेक कारणे असू शकतात, जसं की इंधन गळती, शॉर्ट सर्किट किंवा बॅटरीसारख्या गोष्टी चालत्या वाहनात ओव्हरहिट होणं. इंजिन तापलं असताना जर गाडी वेळीच थांबवली नाही तर चालत्या वाहनात आग लागू शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास उपायांबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही भविष्यात इंजिन जास्त गरम झाल्यामुळे होणारी कोणतीही दुर्दैवी घटना टाळू शकता.


इंजिन जास्त तापण्याची किंवा जास्त गरम होण्याची अनेक कारणे आहेत. साधारणपणे, कूलिंग सिस्टमच्या समस्येमुळे कार जास्त गरम होतात. यामुळे इंजिनच्या डब्यातून उष्णता बाहेर पडू देत नाही. याशिवाय अनेकदा इंजिन कूलिंग सिस्टीम किंवा इतर घटकामध्ये कुठेतरी गळती होऊ शकते. इंजिनच्या डब्यात रबर होसेस, गॅस्केट आणि पाण्याचा पंप यांसारखे अनेक घटक असतात, जे कालांतराने झिजतात किंवा खराब होतात. अशा स्थितीत गळती होण्याची शक्यता वाढते. ज्यानंतर इंजिन गरम होऊन कार पेट घेऊ शकते.


याशिवाय आणखीही गोष्टींमुळे कार गरम होऊ शकते, उन्हाळ्याच्या दिवसात जर भर दुपारी आपण वाहतूक केली तर कूलिंग सिस्टमवर खूप दबाव पडतो. पण यासाठी तुम्ही कारच्या ड्रायव्हिंग स्कील्स बदलू शकता. त्यामुळे कार चालवताना काळजी घेऊन अधिक चांगली देखभाल करून तुम्ही कार जास्त गरम होण्याचा धोका टाळू शकता. यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष द्यावे लागेल. त्याबद्दलही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


गाडी चालवताना इंजिन जास्त गरम होत आहे असे तुम्हाला वाटत असेल तर सर्वप्रथम तुम्ही कारचे हीटर चालू करा. तुम्हाला हे थोडं विचित्र वाटेल पण CarID या ऑटो पार्ट्सच्या पोर्टलनुसार असे करणं अधिक फायद्याचं आहे. यामुळे इंजिनची उष्णता ही थेट कारच्या आत जाते, ज्यामुळे इंजिनच्या कूलिंग सिस्टमवरील भार कमी होतो. काही परिस्थितींमध्ये, हे इंजिनच्या डब्यातून ओव्हरहिटिंग दूर करण्यासाठी पुरेसे असू शकते. यासाठी, तुम्हाला कारच्या स्पीडोमीटरमध्ये दिलेला ओव्हरहिटिंग सिग्नल पाहावा लागेल, जर असे करून तापमानाचा प्रकाश बंद झाला, तर तुम्हाला समजेल की कारचं तापमान नॉर्मल झालं आहे.


कार हिट होण्याआधीच काळजी घेतलेली कधीही चांगली. वेळच्या वेळी कारमधलं पाणी चेक करायला हवं. तसंच कारमध्ये अधिकचं पाणी देखील ठेवायला हवं. याशिवाय टॉवेल, हातमोजे ठेवायला हवे. पेट घेतल्यावर टॉवेलने आग विझवता येईल, किंवा बोनेट खोलण्यासाठी हातमोजे वापरु शकतो. वर आम्ही सांगितल्याप्रमाणे हिटर चालू करावा लागत असल्याने हिटर देखील चेक करणं महत्त्वाचं आहे.