•   Thursday, August 28
लाईफस्टाईल

यंदा आपल्या लाडक्या बाप्पासाठी ‘मोदक’ घरीच करा..

पुष्कर लाभे : गणेशोत्सव म्हटला तर मोदक हे पक्वान्न आपल्या डोळ्यापुढे आलेच. गणपतीला सर्वात जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे मोदक. ‘मोदक’ या यामध्ये मोद असा शब्द आहे. जो पदार्थ खाऊन आनंद मिळतो त्याला "मोदक" असे म्हटले जाते. गणपतीला हा पदार्थ विशेष प्रिय असल्याचे संदर्भ पुराण साहित्यात सापडतात.
गणेशाच्या प्रतिष्ठापनेनंतर २१ मोदकांचा नैवेद्य गणपतीपुढे दाखवल्या जातो. यंदाच्या कोरोना काळात विविध प्रकारचे मोदक कसे तयार करायचे, हे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. आजच ट्राय करून बघा...
पारंपरिक पद्धतीमध्ये उकडीचे मोदक आणि तळणीचे मोदक हे दोन प्रकार प्रचलित आहेत. साधारणतः पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात उकडीचे मोदक तयार करतात. विदर्भात मात्र तळणीचे मोदक तयार करतात. याशिवाय अन्य मोदकाचे प्रकार बघूया...

१. पनीरचे मोदक : पनीरमध्ये साखर, काजू, किसमिस, वेलची पावडर भरून हे सारण रवा, मैद्याच्या पोळीमध्ये भरून तळून काढावे. हा मोदकाचा प्रकार मला दिल्लीला एका ठिकाणी खायला मिळाला.

२. खव्याचे मोदक : हा प्रकार तसा सगळीकडे दिसतो. यामध्ये खव्यात साखर, केशर घालून, भाजून साच्यात घालून मोदक करतात.

३. बेक केलेले मोदक : खोबरं, किसमिस, खव्याचे सारण मैद्याच्या सप्तपारीमध्ये भरून बेक करावे.

४. गूळ कोहळ्याचे मोदक :  हा प्रकार विदर्भातील आतल्या गावातला. गूळ, लाल कोहळा व तेवढीच कणिक घेऊन एकत्र मळावे. मोदकाचा आकार देऊन मंद आचेवर तळावे.

५. पुरणाचे मोदक :  पुरणाचे सारण मैद्याच्या पारीमध्ये भरून मोदक तळून घेतात किंवा वाफवूनसुद्धा घेतात.

६. फ्रुट मोदक :  वेगवेगळया प्रकारची फळे मिक्स फ्रुट जॅममध्ये मिसळून हे सारण मैद्याच्या पारीमध्ये भरून मंद आचेवर तळून घ्यावे.

७. संदेश मोदक : पनीर, खवा, साखर, केशर, वेलची एकत्र मिक्सरमध्ये वाटून याचे मोदक साच्यामध्ये बनवून वाफवून घ्यावे.

८. मनुकांचे मोदक :  मनुका, काजू एकत्र करून त्यात थोडी दूध पावडर घालून त्याचे मोदक वळावे.

९. तीळगुळाचे मोदक :  गुळाचा पाक तयार करून त्यात भाजलेले तीळ घालावे व हे सारण कणकेच्या पारीमध्ये भरून मंद आचेवर तळावे. किंवा तीळ व गुळाचे जे सारण आहे ते थोडे गरम असतानाच साचामध्ये घालून त्याचे मोदक करावे. हा प्रकार यवतमाळ भागात करतात व तिळी चतुर्थीला याचा नैवेद्य दाखवतात.

१०. खोबरं मैद्याचे मोदक :  हा मोदक प्रकार सर्व ठिकाणी आढळून येतो. रवा, खोबरं, खवा, साखर एकत्र करून हे सारण मैद्याच्या वाटीत भरून मंद आचेवर तळावेत.

११. मैद्याचे उकडीचे मोदक :  मैद्याची पारी लाटून मध्ये कुठलेही गोड सारण भरून त्याचे वेगळ्या आकाराचे मोदक करावे व वाफवून घ्यावे. थोडक्यात मोमोज म्हणजेच मोदकासारखा एक प्रकार. ते ज्याप्रकारे करतात तसाच हा प्रकार करावा.

१२. कॅरामलचे मोदक : पनीर, खवा, काजू, किसमिस, साखर एकत्र करून त्याला मोदकाचा आकार द्यावा. हा मोदक साखरेच्या कॅरामलमध्ये बुडवून थंड करून सव्र्ह करावा.

१३. काजूचे मोदक :  काजू कतलीचे सारण घेऊन या मध्ये खवा, खडीसाखर भरून याला मोदकाचा आकार द्यावा.

१४. फुटाण्यांचे मोदक :  फुटाणे बारीक करून त्यात साखर व तूप घालून चांगले मळावे या पिठाला मोदकाचा आकार द्यावा. हा प्रकार गरम न करता चटकन होणारा प्रकार आहे.

बातमीतील ठळक मुद्दे

modak