जालना: काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी
औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरुन काँग्रेसची भूमिका आज शनिवारी थेटपणे
मांडली. या मुद्यावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये कुठलीही नुरा कुस्ती सुरु
नसून, औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसचा विरोधच आहे, असे त्यांनी
स्पष्टपणे सांगितले.
जालना येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली.
यावेळी
बोलताना ते म्हणाले, औरंगाबादचे नामांतर करणे, हा महाविकासआघाडी सरकारच्या
किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही. या नामांतराला आमचा विरोधच आहे. आम्ही
या मुद्द्यावरुन भाजपा आणि एमआयएमसोबत थेट कुस्ती खेळायला तयार आहोत!
औरंगाबादचे
नामांतर हा केवळ स्थानिक पातळीवरचा मुद्दा असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी याबाबत कुठलेही वक्तव्य केलेले नाही, असेही यावेळी अशोक चव्हाण
म्हणाले.
दरम्यान, काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या विपरित भूमिका घेतली आहे.
औरंगाबादचे
नामांतर करणे, हा शिवसेनेचा जुना अजेंडा आहे, असे निरुपम यांनी मुंबईत
प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले. राज्यात सध्या तीन पक्षांचे सरकार आहे,
हे शिवसेनेने लक्षात ठेवावे, असे निरुपम यावेळी म्हणाले.