पोलीस आयुक्तालयातील कमांड कंट्रोल सेंटरचे उद्घाटन
औरंगाबाद: मनपा व स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आलेल्या क्रांती चौक ते गोपाळ टी चौकापर्यंत तयार झालेल्या सायकल ट्रॅकचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्री. ठाकरे यांनी एकनाथ रंग मंदिर रस्त्याचा दर्जा व कामाची पाहणी करत रस्ता नियोजित वेळेत पूर्ण करण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या.
यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खा. इम्तियाज जलील, आ.अंबादास दानवे, आ. संजय शिरसाट, माजी खासदार चंद्रकांत खैरे, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच मनपा आयुक्त आणि प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉ. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्यासह सायकल संघटनेचे अध्यक्ष व आयर्नमॅन असलेले नितिन घोरपडे व सायकलपटु यांची उपस्थिती होती.
यावेळी श्री. ठाकरे, श्री. देसाई, श्री. जलील, श्री. पांडेय यांनी सायकल पटूंसह सायकल ट्रॅकरवर सायकल चालविण्याचा आनंद घेतला. यावेळी श्री. घोरपडे यांनी सायकल ट्रॅक बनविल्याबद्दल प्रशासनाचे आभार व्यक्त केले. तसेच सायकल ट्रॅक हा पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा असून जास्तीत-जास्त नागरिकांनी सायकल चालविण्यासाठी या ट्रॅकचा वापर करावा असे आवाहनही केले.
औरंगाबाद शहर आता सी.सी.टि.व्ही.च्या निगराणीखाली
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालयातील Command Control केंद्राचे उद्घाटन पार पडले. या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरात सातशे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्याच्या सहाय्याने शहरातील गुन्हेगारीवर तसेच इतर घटनांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. हे सर्व कॅमेरे अद्ययावत यंत्रणेने सुसज्ज असे आहेत आणि ते स्वयंचलित आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्ण शहराचे नियंत्रण करण्यात येणार असल्याने पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी या केंद्राचे कौतुक देखील केले.
यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आ. अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच मनपा आयुक्त आणि प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉ. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय आदी उपस्थित होते.