सध्या मोबाइलवर ‘रिल्स’ बनवून सोशल मीडियावर अपलोड करण्याचे जणू फॅडच आले आहे. समाजमाध्यमांवर मिळणाऱ्या लाईक्स प्रतिष्ठेशी जोडून पाहिल्या जात आहेत. यातूनच तरुण व मुले जीव धोक्यात घालून रिल्स बनवत आहेत. यामुळे अनेक अपघात होत आहेत. आता ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीजवळ असलेल्या ठाकुर्ली येथील एका तरुणाला रील बनवणं जीवावर बेतलं आहे.
ठाकुर्ली पंप हाऊस येथे रील बनवत असताना एक तरुण विहिरीत पडला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाच्या मदतीने त्याचा शोध घेतला. दरम्यान, तरुणाचा मृत्यू झाला असून तब्बल ३२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर या तरुणाचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आलं. बिलाल सोहिल शेख असे तरुणाचे नाव आहे.
ठाकुर्ली येथील पंप हाऊसमधील खोल विहिरीत पडून बिलाल या १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिलाल दोन मित्रांसह शनिवारी सायंकाळी ठाकुर्ली येथील पंपहाउस येथे रील बनवण्यासाठी गेला होता. रील काढताना बिलाल तोल जाऊन विहिरीत पडला. दरम्यान, त्याच्या दोन मित्रांनी ही माहिती विष्णूनगर पोलिसांनी दिली. माहिती मिळताच पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या जवानांनी तरुणांचा शोध सुरू केला. पोलीस ठाण्याचे अधिकारी रामचंद्र महाला, विनय कोयंदे, राजेश कासवे, केदार मराठे, महिला कर्मचारी या पथकांनी सदर ठिकाणी शोध कार्य सुरु केले होते.
या विहिरीत प्रचंड गाळ असल्याने शोधकार्यात अडचणी येत होत्या. तसेच विहीर खोल असल्यामुळे वेळही लागत होता. अखेर ३२ तासांच्या प्रयत्नानंतर बिलालचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दरम्यान, बिलाल मुंब्रा येथे राहत असताना केवळ रील काढण्यासाठी म्हणून तो ठाकुर्लीला आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.