कर्णबधिर असूनही सर्वसाधारण प्रवर्गातून परीक्षा देणाऱ्या महिला अधिकारीची गोष्ट
काही दिवसांपूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी चा निकाल लागला. या परीक्षेत अनेकांनी विपरीत परिस्थितीचा सामना करीत प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. प्रशासकीय सेवेतील अधिका-यांच्या प्रेरणादायी प्रवासाने अनेक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते. अशाच एका महिला आयएएस अधिकारीची गोष्ट प्रेरणादायी आहे.
आपण भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी सौम्या शर्मा यांची कहाणी जाणून घेणार आहोत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सौम्या शर्मा इतकी अवघड परीक्षा कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय पास झाल्यात.
सौम्या शर्मा यांनी दिल्लीतील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मधून कायद्याचे शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी एनएलयूमध्ये काम केल्यानंतर लगेचच 2017 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी हा प्रवास सुरू केला. अनेक उमेदवारांप्रमाणे सौम्या शर्मा यांनी यूपीएससी ची तयारी करण्यासाठी कोणत्याही कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी त्यांनी परीक्षेची तयारी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट सीरीजचा आधार घेतला. यानंतर त्या पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने हे स्वयंअध्ययन फार फायदेशीर ठरले.
मुख्य परीक्षेच्या आठवडाभर आधी सौम्याला प्रचंड ताप आला. मात्र आजारपण असूनही 102-103 डिग्री ताप असताना सुद्धा त्या परीक्षेला बसल्या होत्या. सौम्याला परीक्षेच्या हॉलमध्ये सुट्टीच्या वेळीही दिवसातून तीन वेळा सलाईन ड्रीप देण्यात आले. सौम्या शर्मा कर्णबधिर असूनही त्यांनी कोणत्याही सवलतीवर विसंबून न राहता सर्वसाधारण प्रवर्गात अर्ज केला. प्रश्न पटकन समजून घेण्याची आणि विश्लेषण करण्याची त्यांची क्षमता तसेच सामान्य ज्ञानातील त्यांचा भक्कम पाया यामुळे त्यांना यश मिळाले.
सौम्या शर्माने पहिल्याच प्रयत्नात वयाच्या 23व्या वर्षी यूपीएससी परीक्षेत देशभरात नववा क्रमांक मिळवत नेत्रदीपक स्थान पटकावले. त्यांची जिद्द आणि चिकाटी स्पर्धा परीक्षेत यश मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी प्रेरणादायी ठरते. आज आयएएस सौम्या शर्मा ह्या नागपूर शहरात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.