देशाची गुप्तचर संस्था रॉ चे प्रमुख म्हणून रवी सिन्हा यांच्या नियुक्तीला केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने मान्यता दिली आहे. छत्तीसगड कॅडरचे आयपीएस अधिकारी रवी सिन्हा नवे रॉ प्रमुख असतील. रवी सिन्हा यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. रवी सिन्हा हे सामंत कुमार गोयल यांची जागा घेतील. सामंत कुमार गोयल यांचा रॉ प्रमुखपदाचा कार्यकाळ 30 जून रोजी संपत आहे. सामंत गोयल यांना सरकारने अनेक वेळा एक्सटेंशन दिलं होतं.
रवी सिन्हा यांच्या बद्दल
- रवी सिन्हा हे 1988 बॅचच्या छत्तीसगड कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत.
- रवी सिन्हा हे विद्यमान रॉ प्रमुख सामंत गोयल (1984 बॅचचे पंजाब कॅडरचे आयपीएस अधिकारी) यांची जागा घेतील. सामंत गोयल 30 जून रोजी निवृत्त होत आहेत.
- रवी सिन्हा हे दोन वर्षांसाठी रॉच्या प्रमुखपदी असतील.
- सध्या ते केंद्रीय प्रतिनियुक्तीवर कॅबिनेट सचिवालयात विशेष सचिव पदावर कार्यरत आहेत.
- हे पद विशेष सचिव दर्जाचे आहे. त्यांची पुढील पोस्टिंग रॉ मध्ये सचिव म्हणून असेल.

रवी सिन्हा हे मुळचे बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील आहेत. त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं आहे. 1988 मध्ये यूपीएएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी म्हणून मध्य प्रदेश कॅडर प्राप्त केले. मात्र 2000 मध्ये, तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारने मध्य प्रदेशातून छत्तीसगड राज्याची निर्मिती केली तेव्हा सिन्हा तांत्रिकदृष्ट्या छत्तीसगड कॅडरमध्ये गेले.
रॉ काय आहे, काम काय करते?
संशोधन आणि विश्लेषण विंग (RAW) ची स्थापना 21 सप्टेंबर 1968 रोजी झाली होती. 1968 पर्यंत गुप्तचर यंत्रणा अर्थात आयबी (IB) हीच संस्था भारताच्या अंतर्गत आणि बाह्य गुप्तचर कारवाया करत असे, परंतु 1962 आणि 1965 च्या युद्धात भारताची गुप्तचर संस्था अपयशी ठरल्यानंतर सरकारने 1968 मध्ये 'रॉ' नावाची स्वतंत्र गुप्तचर संस्था स्थापन केली होती. इंदिरा गांधी सरकारमध्ये रॉ अस्तित्वात आली. रामेश्वर नाथ काव हे पहिले प्रमुख होते. रॉ ही संस्था थेट पंतप्रधानांना अहवाल देते. गुप्तचर ऑपरेशन्स, भारताच्या शेजारी देशांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे हे रॉ चे काम आहे. मुख्यत्वे पाकिस्तान आणि चीनच्या कारवायांवर लक्ष ठेवून आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बांगलादेशच्या निर्मितीमध्ये रॉ ने नेहमी महत्त्वाची भूमिका बजावली होती.