•   Thursday, August 28
तंत्रज्ञान

अरे वा! आता भाड्यानं घर शोधताना एजंटची गरज नाही, 'हे' ५ ॲप्स करतील मदत

आजकाल अनेकांना नोकरी, शिक्षण किंवा इतर कोणत्याही कामासाठी दुसऱ्या शहरात शिफ्ट व्हावे लागते. त्याठिकाणी भाड्याने घर घ्यावे लागते. पण वाढत्या लोकसंख्येमुळे कितीतरी मोठ्या शहरांत गर्दी वाढली असून साधं घर भाड्यानं मिळणंही खूप कठीण झालं आहे. त्यात घर भाड्यानं घेताना बऱ्याच गोष्टी पाहाव्या लागतात. त्यात घर ऑफिसपासून किती अंतरावर आहे, किती खोल्या आहेत,काय काय फीचर्स घरात आहेत. दरम्यान हे सगळं पाहताना तुम्हाला मदत करणारा एजंटही बरेच पैसे घेतो. पण आता या साऱ्या समस्यांपासून सुटका मिळणार असून स्वतःहून तुम्ही घरबसल्या मोबाईलवर घर शोधू शकता. आजकाल अशा अनेक कंपन्या आहेत, ज्यांच्या ॲपच्या मदतीने तुम्ही सहजपणे भाड्याने घर शोधू शकता. तुम्ही तुमचे बजेट, आवडी आणि नापसंत यावर आधारित निवड करू शकता. चला तर या विविध ॲप्समधील ५ महत्त्वाचे अॅप्स पाहूया...


हे 99acres.com या लोकप्रिय प्रॉपर्टी ॲपच्या मदतीने युजर्स मोफत घर भाड्याने घेऊ शकतात. या ॲपमध्ये वापरकर्त्याला उच्च दर्जाची चित्रे, व्हिडिओ आणि नकाशांद्वारे प्रॉपर्टीची संपूर्ण सविस्तर माहिती मिळते. या ॲपमध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्तांची नोंदणी केली गेलेली आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना विविध पर्यायांच्या बाबतीत कोणतीही अडचण येत नाही. येथे तुम्ही घरमालकाशी थेट बोलू शकता, संपर्क क्रमांक मिळवू शकता. यासोबतच टेक्स्ट आणि ई-मेलची सुविधाही दिली गेली आहे.


मॅजिकब्रिक्स ॲपमध्ये जीपीएस हे खास फीचर आहे, जे तुम्हाला हवं त्या लोकेशनवरील अचूक ऑप्शन्स दाखवते. तसंच कंपनीने ॲपचा इंटरफेस साधा ठेवला असून त्यामुळे तो वापरण्यासाठी सोपा आहे. या ॲपमध्ये वापरकर्त्याला थेट घरमालकाशी संपर्क साधता येतो. तुम्हाला हव्या तशा चांगल्या प्रॉपर्टीसाठी अलर्ट देखील येथे मिळू शकतात.


वापरलेल्या सेकंड हँड वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी OLX हे लोकप्रिय ॲप भाड्याने घर मिळवण्यासाठीही उपयुक्त आहे. यातही जीपीएसच्या मदतीने तुम्हाला ज्या भागात घर हवे आहे, त्याचे पर्याय दाखवले जातात. संपर्क क्रमांकापासून घराची सर्व माहिती आणि छायाचित्रे याठिकाणी उपलब्ध असतात. यात युजर सोप्या पद्धतीनं लॉग इन करू शकतो आणि भाड्याने घर मिळवू शकतो.


तुम्ही जाहिरातींमध्ये Nestaway बद्दल ऐकले असेल. हे ॲप देखील भाड्यानं घर शोधण्यासाठी एक भारी ॲप आहे. यामध्ये प्रॉपर्टी शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर्टीला भेट देण्यची सुविधाही मिळते. याठिकाणी भाडे करार इत्यादी देखील ॲपवरूनच केले जाऊ शकते.


फ्लॅटचॅट हे ॲप दिल्ली, बंगळुरू, मुंबई, पुणे, हैदराबाद आणि चेन्नई सारख्या शहरांमध्ये सक्रिय आहे. तुम्ही येथे साइन अप करून भाड्याने घर तसंच पीजीमध्ये राहण्यांसाठी फ्लॅटमेट निवडण्याची देखील क्षमता आहे. या ॲपमध्ये तुम्हाला बजेट आणि ठिकाणांच्या दृष्टीने बरेच पर्याय देते. नंतर, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घर निवडू शकता.