•   Thursday, August 28
विदर्भ

ट्रॅव्हल्स बस अन् कारच्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू

नागपूरवरून नागभीडकडे येणार्‍या कारने नागभीडवरून नागपूरकडे जाणार्‍या एआरबी ट्रॅव्हल्सच्या बसला नागभीडपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या कान्पा येथे जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील सर्व 6 जणांचा मृत्यू झाला. हा अपघात रविवार, 4 जून रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास झाला. यात नागपूरचे रोहन विजय राऊत (30, नागपूर), ऋषिकेश विजय राऊत (28), गीता विजय राऊत (50), सुनीता रुपेश फेंडर (40, रा. नागपूर), प्रभा शेखर सोनवणे (35, रा. लाखनी, जि. भंडारा), यामिनी फेंडर (9, रा. नागपूर) अशी मृतकांची नावे आहेत.

रुपेश विजय राऊत हे गेल्या एक वर्षापासून विभक्त राहत असलेल्या आपल्या पत्नी व मुलाला भेटायला ब्रम्हापूरी तालुक्यातील किन्ही या गावी भाऊ, आई व इतर नातेवाईकांसोबत नागपूर येथील शेजारी रोशन तागडे यांच्या गाडीने जात होते. या अपघाताची माहिती होताच नागभीड पोलिस ठाण्याचे ठाणेदार योगेश घारे आपल्या कर्मचार्‍यासह घटना स्थळी पोहचले व मृतकांना बाहेर काढले. यात दोन महिला व दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झाला व एक बालिका व महिला गंभीर जखमी झाल्याने त्यांना नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. यापैकी प्रभा सोनवाने हिचा जखमी अवस्थेत नागभीड येथील रुग्णालयात मृत्यू झाला. तर यामिनी रुपेश फेंडर (9) वर्षे हिचा नागपूर येथे रुग्णालयात नेत असताना वाटेत मृत्यू झाला. 

दरम्यान पोलिसांनी ट्रॅव्हल्सचे चालक राजेंद्र लाकडू वैरकर (रा. मेंडकी) यांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे यांनी भेट दिली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चेंदामेंदा झाला. पोलिसांनी तत्परता दाखवत गावकर्‍यांच्या मदतीने खंतीने कारचे दरवाजे तोडून फसलेल्या मृतकांना व जखमींना बाहेर काढले. जखमी लहान मुलीला ठाणेदार घारे यांनी आपल्या दोन कर्मचार्‍यासोबत नागपूर येथील रुग्णालयात पाठवले होते.