•   Thursday, August 28
विदर्भ

Ashadhi Wari 2023 : विठू माऊलीच्या कानात मासोळ्या का आहेत?

आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांसाठी दिवाळीच. या दिवाळीत ना फराळ असतो ना तामझाम, ना फटाक्यांचा उत्साह ना नवे कपडे तरीही ती दिवाळी स्पेशल असते. दिवसरात्र चालत जेव्हा वारकरी विठूरायाच्या चरणी नतमस्तक होतात. तेव्हा वारकऱ्यांच सगळं दुख: संपतं.


विठू माऊलीचे रूप डोळाभर पहावे असेच आहे. अगदी निरखून पाहिलं तर विठूरायाच्या हनुवटीवर खळी पडते आणि तो आपल्याकडे पाहुन स्मितहास्य करतोय असेच दिसते. पांडूरंगाची प्रत्येक गोष्ट खास आहे.


दिनांचा दयाळू, भक्तकामकल्पप्रदुम आणि योगियादुर्लभ असलेल्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामय शिलेची आहे. श्रींच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी आहे. याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्यास शिवलिंग म्हणतात.


श्रींचे मुख उभट आहे. गाल फुगीर आहेत. दृष्टी समचरण आहे. कानी मकर कुंडले आहेत. गळ्यात कौस्तुभमणी आहे. पाठीवर शिंके असून ह्रदयस्थानी श्रीवत्सलांछन आहे. दोन्ही दंडावर अंगद असून मनगटावर मणिबंध आहेत.


श्रीविठ्ठलाने हात कटेवर ठेवलेले आहेत. उजव्या हातात कमळाचा देठ असून हात उताणा, अंगठा खाली येईल असा टेकविला आहे, तर डाव्या हातात शंख आहे. श्रींचे कमरेला तिहेरी मेखला आहे. छातीवर उजवीकडे भृगुऋषींनी पादस्पर्श केलेली खूण आहे. ब्रह्मदेव निघालेली नाभी आहे. कमरेला वस्त्र आहे.


वस्त्राचा सोगा पावलापर्यंत आहे. डाव्या पायावर मुक्तकेशी नावाच्या दासीने बोट लावलेची खूण आहे. अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे. विठ्ठलाच्या कानात असलेली मकर म्हणजेच मासे यांची कथा काय आहे. माशांना पांडुरंगाच्या कानात स्थान कसे मिळाले असा प्रश्न अनेकांना पडतो.


याचं खरं उत्तर असं की, विठोबाच्या कानात मासे नाहीत तर माशांच्या आकाराची कुंडले आहेत. महाभारतात कर्णाला जन्मत: सुवर्णकुंडले आणि सुरर्ण कवच होते. तसेच एका भक्ताच्या भोळ्या भक्तीवर भाळून विठोबाने माशांना कानात स्थान दिले आहे.


यामागची कथा अशी आहे की, एकदा एक कोळी पांडूरंगाना भेटायला उपहार द्ययला त्यांच्याकडे जातो. पण त्याला इतर लोक आतमध्ये जाऊ देत नाहीत, का कारण की तो एक मच्छिमार आहे न. आणि तसाही तो जे उपहार देणार असतो ते खुद्द त्याने पकडलेले मासे असतात आणि ते पण दोन. बाकीचे म्हणतात पांडुरंग देव आहेत, त्यांना मासे का देतोय, पाप लागेल तुला आणि आम्हा सर्वांना.


तेव्हा पांडुरंग खुद्द तिथे येतात आणि सगळ्यांना सांगतात की..


"तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय. त्याच्याकडे काही नसून तरी तो देतोय त्याकडे पहा. आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्विकार करेल, मग ते काही ही असू द्या. कारण मी ही सृष्टी चालवली आहे त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी पण आहेत.


आणि मी तुम्हा सर्वांना प्रेम करतो आणि प्रेम हे लहान मोठ्या भेद्भाव्नेत अडकत नाही." असं सांगून ते त्या व्यक्ती कडून ते दोन मासे घेतात आणि सर्वाना समजल पाहिजे की सगळे समान आहे म्हणून आपल्या कानात कुंडलासारखे घालून घेतात.


एका अभंगात या मकर कुंडलांचा उल्लेख "मकर कुंडले तळपती श्रवनी" अर्थात कानात माश्याच्या आकाराचे कुंडल असलेलं होय.


पांडुरंग अर्थात 'पांढर्या रंगाचा' ना मग मूर्तीचा रंग काळा का ?? काही जण म्हणतात की पांडुरंगाचा खरा रंग पांढराच आहे. ज्यावेळेस आपण पूर्ण समाधीत असू किंवा आपल्याला साक्षात्कार होईल तेव्हाच पांडुरंग पूर्ण पांढरे आपल्याला दिसतील. बहुतेक त्या ध्यानधारणेशी मस्त्य कुंडल, कमळ, वीट ह्यांचा काही संबंध असावा.