•   Thursday, August 28
विदर्भ

उफ़ ये गर्मी! चा अजब प्रकार: 'ट्रे मध्ये ठेवलेल्या अंड्यांतून बाहेर आले पिल्ले

नागपूरसह संपूर्ण विदर्भात उन्हाळा तीव्र  तडाका बसत आहे. यंदा उन्हाची तीव्रता अधिक आहे. विदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशांच्या वर चढत आहे. त्याचा मानवावरच नाही तर निसर्गावरही गंभीर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या एक व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात तापमानामुळे टेम्पोमध्ये असलेल्या ट्रे मध्ये ठेवलेल्या कोंबडीच्या अंड्यातून पिल्ले बाहेर येताना दिसत आहेत.

   

मुळात, पिल्ले अंड्यातून बाहेर येण्यासाठी उब मिळणे आवश्यक असते. मात्र, असामान्य तापमानामुळे पिल्ले उब न घेता अंड्यातून बाहेर पडत आहेत. असाच प्रकार नागपूरहून भंडारा जाणाऱ्या अंडा गाडीत घडला. हा व्हिडिओ नागपुरातील महामार्ग पोलिसांनी शूट केला आहे.


अंडा गाडी नागपूरहून भंडारा येथील हॅचरीकडे जात असताना ही घटना समोर आली आहे. ते काहीही असले तरी हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

नागपुरातील पारा यंदा तीनवेळा ४५ अंशांच्या पुढे गेला आहे. नागपुरात यंदा तापमानाचा विक्रम मोडला नसला तरी उष्णतेच्या दिवसांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. हे चित्र एकट्या नागपूरचे नाही. हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंग यावर शास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञांमध्ये मतभेद आहेत. परंतु अलीकडच्या काळात जगभरात तापमानात वाढ झाली आहे आणि आता तापमानात झालेली ही वाढ सामान्य नाही यावर सर्वांचे एकमत आहे.


उष्णतेची ही स्थिती केवळ भारत, पाकिस्तान किंवा सौदी अरेबियामध्ये नाही. जगभरातील अनेक देशांना यंदा तीव्र उष्णतेच्या प्रकोपाचा सामना करावा लागला आहे. उत्तरेकडील देशांमध्येही यंदा तापमानात वाढ झाली आहे. डिसेंबर 2018 मध्ये प्रकाशित झालेल्या एका वैज्ञानिक अभ्यासानुसार, आर्क्टिक समुद्रातील 95 टक्के जुना आणि खूप जाड बर्फ नाहीसा झाला आहे. उष्णतेच्या लाटेमागील मुख्य कारण म्हणजे निसर्गातील मानवी हस्तक्षेप म्हणजे प्रदूषण आणि जंगलतोड ही आहे.हा बदल निसर्गातील मानवी हस्तक्षेपामुळे होत असल्याचा दावा करणारे विविध शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.