मेगास्टार प्रभास आणि दिग्दर्शक ओम राऊत यांच्या रामायणाच्या कथेवर आधारित ‘आदिपुरुष’ या चित्रपटावर वाद सुरू आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीही सिनेमाच्या व्हीएफएक्स आणि इतर मुद्द्यांवरून वाद सुरू होते. त्यानंतर आता चित्रपट प्रदर्शित होताच हा सिनेमा वादाच्या गर्तेत सापडला आहे. अशातच नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.
भारताच्या शेजारील देश नेपाळच्या राजधानीच्या शहरात म्हणजेचं काठमांडूमध्ये ‘आदिपुरुष’ सिनेमावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटात सीतेच्या भारताच्या कन्येच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत नेपाळची राजधानी काठमांडूचे महापौर बलेन शाह यांनी या चित्रपटाच्या शहरात प्रदर्शनावर बंदी घातली आहे.
शहरातील सर्व चित्रपटगृहांना तशा लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. जोपर्यंत हा सीन हटवत नाही तोपर्यंत शहरातील कोणत्याही चित्रपटगृहात हा चित्रपट दाखवू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
‘आदिपुरुष’ वरील ही बंदी सध्या काठमांडूपुरती मर्यादित आहे. सध्या तरी संपूर्ण नेपाळमध्ये बंदी घालण्यात आलेली नाही. मात्र, संपूर्ण देशात या चित्रपटावर बंदी घातली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बहुप्रतीक्षित ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा सिनेमा १६ जून रोजी प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगली कामगिरी करताना दिसत असला तरी सिनेमावर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. चित्रपटातील संवादावरही आक्षेप घेतला असून चित्रपटाच्या निर्मात्यांनी लवकरच आदिपुरुषच्या काही संवादांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.