•   Thursday, August 28
मनोरंजन

सावळ्या रंगावरून बोलणाऱ्यांना भाऊ कदम यांच्या लेकीचं उत्तर

चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचणारा लोकप्रिय अभिनेते भाऊ कदम. पण सध्या भाऊ कदमची लाडकी लेक मृण्मयी कदम तिच्या स्किन टोनमुळे चर्चेत आहे. मृण्मयीचं स्वतःचं युट्यूब चॅनेल आहे. ती फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप या संबंधित व्हिडीओ शेअर करते. या सोबतच ती ट्रेन्डी हेअर बो नावाचा बिझनेस देखील करते. तिच्या या ब्रँडचं नाव 'तारुंध्या' असं आहे.


ती सोशल मीडियावर सक्रिय असते. पण सध्या ती एका वेगळ्याच विषयामुळे चर्चेत आहे. तिने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये मृण्मयीला अनेकदा तिच्या सावळ्या रंगावरून ट्रोल करण्यात येतं. त्यावर तिने उत्तर दिले आहे.


भाऊ कदमची लाडकी लेक मृण्मयी कदम याने स्वतःचं चॅनेल सुरू केलं. मात्र तिला तिच्या डस्की स्किनवरून अनेकदा ऐकवण्यात येतं. नुकतीच मृण्मयीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत रंगाबद्दल बोलताना मृण्मयी म्हणाली, 'मी व्हिडीओ बनवायला सुरुवात केली तेव्हा हा विचार कधीच माझ्या डोक्यात आला नाही.


लहानपणी कुटुंबामध्ये मला अशी वागणूक कधीच मिळाली नाही.आमच्या घरात सगळ्यांचाच डस्की स्किन टोन आहे. पण त्यामुळे मी जेव्हा युट्यूब चॅनल सुरु केलं तेव्हा यावरून मला काही ऐकावं लागेल त्यावेळी मी असा विचार कधीच केला नव्हता.


माझ्या स्किन टोनबद्दल लोक इतका का विचार करतात हे मला समजतच नव्हतं. लोक मला विचारायचे असा स्किन टोन असून तुला इतका आत्मविश्वास कसा आहे. पण मला असं वाटतं की एखाद्या गोऱ्या मुलीला तुम्ही असं विचाराल का तुला इतका आत्मविश्वास कसा?' असा सवाल तिने केला आहे.


तुमच्या त्वचेचा रंग कोणती आहे ही गोष्ट महत्त्वाची नाही पण तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेणं महत्त्वाचे आहे.