•   Thursday, August 28
मनोरंजन

‘हा’ चित्रपट पाहण्याआधी घ्यावा लागणार डॉक्टरचा सल्ला; नवा चित्रपट चर्चेत

अरी एस्टरचा ‘ब्यू इज अफ्रेड’ (Beau Is Afraid) हा २०२३ सालचा एक असा चित्रपट आहे, ज्याची प्रचंड चर्चा होत आहे. हा चित्रपट ना भयपट आहे ना कोणत्याही सत्य घटनेवर आधारित आहे पण तरीही त्याची चर्चा जोरात सुरू आहे. हा चित्रपट निराशाजनक वातावरणात बनवण्यात आला आहे आणि नैराश्यात गेलेल्या लोकांवर चित्रित करण्यात आला आहे. या चित्रपटाची कथा ही फारच वेगळी आहे.


हा एक उत्तम चित्रपट आहे, यात काहीच वाद नाही. डोकं सुन्न करणारे सीन्स, विचित्र डायलॉग आणि ब्लॅक कॉमेडी यामुळे हा या वर्षातील सर्वात विचित्र चित्रपट ठरला आहे. संपूर्ण चित्रपटाची कथा नैराश्येच्या गर्तेत लोटला गेलेला, जगाला घाबरणारा ब्यू (व्हाकिन फिनिक्स) भोवती फिरणारी आहे. ब्यू हा त्याच्या आईपासून दूर राहतोय. आईला भेटायला जाताना त्याच्या बाबतीत अशा काही विचित्र घटना घडतात की तो त्यात पूर्णपणे अडकतो, याबरोबरच तो एका आजाराशी झुंजत असल्याचंही चित्रपटात दाखवलं आहे.


एकंदरच हे कथानक आणि यातील सीन्स हे प्रत्येकालाच बघवतील असे नसल्याचं स्पष्ट झालं आहे. या चित्रपटाबद्दल आणखी एक गोष्ट चर्चेत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी डॉक्टरचा सल्ला घेणं आवश्यक आहे, असं काही लोकांचं म्हणणं आहे; कारण चित्रपट पाहून झाल्यावर त्याचा प्रभाव मनुष्यावर राहतो, असं काहींचं म्हणणं आहे.


तीन तासांच्या या चित्रपटात व्हाकिन फिनिक्स या कलाकाराने मुख्य भूमिका साकारली आहे. याआधी व्हाकिनने ‘जोकर’ या चित्रपटातून आपल्या लाजवाब अदाकारीने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली होती. ती भूमिकासुद्धा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ करणारीच होती. ‘ब्यू इज़ अफ्रेड’ हा चित्रपट २६ मे रोजी भारतात रिलीज झाला, पण फार मर्यादित स्क्रीन्सवर हा रिलीज केला गेला. आता लोक या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची वाट बघत आहेत.