•   Thursday, August 28
कोकण

रायगड जिल्ह्याला 100 कोटींंची तातडीची मदत जाहीर

पंचनाम्यानंतर भरपाईचं स्वरूप ठरणार: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

अलिबाग : निसर्ग चक्रीवादळाचा 3 जूनला कोकणाच्या पश्चिम किनारपट्टीला तडाखा बसला आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्याचा दौरा केला. यावेळेस थळ गावाला भेट दिली आहे. रायगडमधील अनेक गावांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. आज राज्य सरकारकडून रायगड जिल्हयाच्या पुनर्वसनासाठी 100 कोटींची तातडीची मदत जाहीर केली आहे.

दरम्यान चक्रीवादळाच्या तडाख्याने श्रीवर्धन, रोहा या भागामध्ये अनेक घरांचे छप्पर उडून गेले आहेत. घरांचं मोठं नुकसान झालं आहे. त्याच्या पंचनाम्यासाठी पुढील 4-6 दिवस लागणार आहे. त्यानंतर नुकसान भरपाईचं स्वरूप ठरवलं जाईल, असेही ठाकरे म्हणाले आहे. दरम्यान चक्रीवादळानंतर या भागात वीज पुरवठा, मोबाईल टॉवर यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यासाठी अधिकची कुमक रायगडमध्ये पाठवण्यात येणार आहे.

रायगडमधील पंचनामे पाहून नुकसान भरपाईची रक्कम ठरवली जाणार आहे. पंचनाम्याला सुरूवात झाली आहे. यासोबतच भविष्यात चक्रीवादळाचा धोका पाहता काय तयारी करता येऊ शकते? घर बांधण्याची पद्धत कशी असावी? याचा देखील आराखडा बनवण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

3 जूनच्या दुपारी रायगडकरांनी वादळाचा संकट झेललं आहे. वादळादरम्यान या भागात वार्‍याचा वेग सुमारे 120 किमी प्रति तास इतका होता. रायगड सोबतच रत्नागिरी, पुणे या भागतही काही ठिकाणी घरांचे मोठे नुकसान झालं आहे. लहान मोठी झाडं उन्मळून पडली आहेत. त्याच्या साफसफाईची काम सुरू करण्यात आली आहे. जनसामान्यांचंं आयुष्य पूर्ववत होण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील असा विश्वास त्यांनी जनतेला दिले आहे.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे देखील रायगडमध्ये पोहचले होते. यावेळी त्यांनी स्थानिक आमदार आदिती तटकरे देखील उपस्थित होत्या. त्यांनी नुकसानीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली आहे.

बातमीतील ठळक मुद्दे

Maharashtra Nisarg Alibagh Cyclone CMO Maharashtra