वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात टीम इंडियाचा २०९ धावांनी पराभव झाला. भारताने रविचंद्रन अश्विनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला नाही. टीम इंडियाच्या या निर्णयावर माजी भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकरने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सचिनने ट्विट केले की, अश्विनला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवणे माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे.
डब्ल्यूटीसी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा २०९ धावांनी पराभव केला. भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी अश्विनचा संघात समावेश न करण्याच्या निर्णयाचा बचाव करताना सांगितले की, पावसामुळे त्यांना चौथ्या वेगवान गोलंदाजासोबत जावे लागले. तेंडुलकरने रविवारी ट्विट केले की, “भारताला सामन्यात टिकून राहण्यासाठी पहिल्या डावात मोठी धावसंख्या करायची होती, पण ते करू शकले नाहीत. भारतीय संघासाठी काही चांगले क्षण होते, पण अश्विनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश न करण्याचा निर्णय मी पचवू शकत नाही. तो सध्या जगातील नंबर वन कसोटी गोलंदाज आहे.
ऑस्ट्रेलियन संघात अनेक डावखुरे फलंदाज असताना अश्विनच्या क्षमतेचा गोलंदाज वेगवान गोलंदाजांना अनुकूल परिस्थितीत वापरता येत नाही, या युक्तिवादाने सचिन हैराण झाला होता. तो म्हणाला, “मी सामन्यापूर्वी सांगितले होते की, कुशल फिरकीपटू खेळपट्टीकडून मिळणाऱ्या मदतीवर अवलंबून राहत नाही. तो वारा, खेळपट्टीची उसळी आणि याचा वापर करतो. पहिल्या आठमध्ये ऑस्ट्रेलियाचे पाच डावखुरे फलंदाज होते हे विसरता कामा नये.”
अश्विनने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या सत्रातील दोन वर्षांच्या वर्तुळात १३ कसोटी सामन्यांमध्ये ६१ बळी घेतले आहेत. भारतीय संघाच्या संघ निवडीवर प्रश्न उपस्थित करताना सचिनने ऑस्ट्रेलिया संघाचे कौतुक केले. सचिनने ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथचे कौतुक केले.
सामन्याबद्दल बोलायचे, तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ४६९ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाने प्रत्युत्तरात आपल्या पहिल्या डावात सर्वबाद २९६ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव ८ बाद २७० धावांवर घोषित केला. यानंतर ऑस्ट्रेलियाने दोन्ही डावाच्या जोरावर भारतीय संघासमोर ४४४ धावांचे लक्ष्य ठेवले. ज्याचा पाठलाग करताना भारतीय संघ आपल्या दुसऱ्या डावात २३४ धावांवर गारद झाला.