जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामान्यांचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियाने गाजवला. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्राव्हिस हेडने शतकी खेळी करून आपल्या संघाला ३ बाद ३२७ अशा सुस्थितीत नेले. शिवाय, हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी चौथ्या विकेटसाठी २५१ धावांची अभेद्य भागीदारी केली. हेडने नाबाद १४६ धावा केल्या तर स्टीव्ह स्मिथला शतकासाठी आणखी पाच धावांची गरज आहे. त्याच्या ९५ धावा झालेल्या आहेत.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या काही षटकात भारताचा कर्णधार रोहित शर्माचा हा निर्णय योग्य ठरत असल्याचे जाणवले. पहिल्या ७६ धावांतच ऑस्ट्रेलियाचे ३ फलंदाज माघारी परतले. मात्र त्यानंतर स्मिथ आणि हेड यांनी चिवट खेळी करत अडीचशे धावा जोडल्या.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथनेही दुसऱ्या टोकाने किल्ला लढविला. २२७ चेंडूंत त्याने ९५ धावांची नाबाद खेळी केली. हेड म्हणतो की, मला स्टीव्ह सोबत फलंदाजी करायला खूप आवडते. कारण तो सोबत असताना प्रतिस्पर्धी गोलंदाज त्याच्याविरुद्ध योजना आखत असतात तेव्हा मला मोकळेपणाने फलंदाजी करता येते.
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर हेड म्हणाला की, नाणेफेक हरलो असलो तरी पहिल्या दिवशी आम्ही चांगली कामगिरी केली. सकाळी खूप मेहनत घ्यावी लागली. पण एक चांगली सुरुवात झाली आहे. भारताच्या मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांनी उसळत्या चेंडूंचा मारा केल्यामुळे हेडला शतक करण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागली.
हेड म्हणाला की, मी सध्या अत्यंत चांगल्या स्थितीत आहे. पण माझी खूप परीक्षा पाहिली गेली. काही वेळा वाटले की भारतीय संघाने आपल्यासाठी काही व्यूहरचना केली आहे की, काय असेही वाटून गेले. पण मी परिस्थितीशी जुळवून घेतले, मेहनत घेतली, त्या कठीण काळात तग धरली आणि त्याचवेळेला संयमही राखला.