•   Thursday, August 28
क्रीडा

WTC Final 2023: भारत-ऑस्ट्रेलिया आमने-सामने, असे असतील दोन्ही संघ

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला आजपासून सुरूवात होत असून भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात होणार आहे. दोन्ही बलाढ्य संघ लंडनच्या ओव्हल मैदानावर आमनेसामने आले  आहेत. अंतिम सामना सुरू व्हायला अवघे काही तासांचा अवधी राहिला आहे.


भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघानी आत्तापर्यंत आयसीसी अंडर-19, टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषकांसह चॅम्पियन्स कपही जिंकलेला आहे. दोन्ही देशांकडे आयसीसीच्या सर्वाधिक 11-11 ट्रॉफी आहेत. त्यामुळे जागतिक कसोटी विजेतेपदाचा अंतिम सामना जिंकून आयसीसीच्या सर्व स्पर्धा जिंकण्याचा बहुमान मिळविण्यासाठी दोन्ही संघ मैदानावर जोरदार प्रयत्न करताना दिसतील. त्यामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकून भारतीय संघ इतिहास घडवणार की ऑस्ट्रेलिया ट्रॉफी आपल्या नेणार याकडे जगातील प्रत्येक किक्रेटप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत. 


ओव्हल मैदानावर दोन्ही संघांचे रेकॉर्ड खास नाही


दोन्ही संघांमधील सामना आजपासून लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारताच्या तुलनेत या मैदानावर ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक सामने खेळले असले तरी दोन्ही संघांचे रेकॉर्ड फारसे खास नाही. ऑस्ट्रेलियाने या मैदानावर 38 कसोटी सामने खेळताना फक्त 7 सामन्यात विजय मिळवला आहे. तर भारतीय संघाने 14 सामने खेळताना फक्त 2 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे आज होणारा सामना दोन्ही संघांसाठी अटीतटीचा असणार आहे.


भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 106 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी ऑस्ट्रेलियाने 44 सामने, तर भारतीय संघाने 32 सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारतीय संघापेक्षा 10 सामन्यांनी ऑस्ट्रेलियाचे पारडे जड आहे. ओव्हल मैदानावर भारतीय संघाने आपला शेवटचा सामना 2021 मध्ये खेळला होता. त्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता, तर ऑस्ट्रेलियाला 2019 मध्ये या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.


भारतीय संघाला WTC जिंकण्याची संधी


भारतीय संघाने 2021 मध्ये साउथॅम्प्टनमध्ये न्यूझीलंडसोबत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना खेळला होता. या सामन्यात भारतीय संघाला 8 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला होता. पण यावेळी भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना जिंकण्याची संधी आहे. कारण काही महिन्यांपूर्वी भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचा भारतीय संघाने कसोटी मालिकेत 2-1 ने पराभव केला होता. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला असून पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचा पराभव करून जागतिक टेस्ट चॅम्पियनशिपच्या जेतेपदावर आपले नाव कोरण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे.


WTC साठी भारतीय संघ


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ईशान किशन (विकेटकीपर), केएस भरत (विकेकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट.

राखीव खेळाडू : यशस्वी जायसवाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.