•   Thursday, August 28
उत्तर महाराष्ट्र

तापी नदीवरील खेडी भोकर पुलाचा प्रश्न मार्गी लागणार: गुलाबराव पाटील

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या चोपडा- भोकर -जळगाव रस्ता राज्य मार्ग  40 या रस्त्यावरील खेडी भोकर पुलाच्या बांधकामास तत्वतः मान्यता मिळाली असून जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रत्येकी 50 टक्के निधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
खेडी भोकर फुलाच्या बांधकामासंदर्भात गुरुवारी मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या पुलाच्या बांधकामासाठी जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रत्येकी 50 टक्के निधी उपलब्ध करून देण्याचे मान्य केले. या पुलाच्या बांधकामासाठी पुरवणी अंदाजपत्रकात खर्चाची तरतूद करावी. तसेच पुलाच्या बांधकामाच्या कामाला तातडीने प्रशासकीय मान्यता देवून  कामाला गती देण्याचे निर्देशही मंत्री जयंत पाटील व मंत्री चव्हाण यांनी यावेळी दिले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार लताताई सोनवणे, आमदार अनिल पाटील, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव, तापी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री.कांबळे, नदीजोड प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार व्ही. डी. पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यातील जळगावसह भुसावळ, यावल, चोपडा या चार तालुक्यातील शेतकरी व नागरिकांच्या दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या खेडी-भोकर पुलाचा वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला प्रश्न जळगाव पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांमुळे मार्गी लागणार आहे.
खेडी- भोकर ते चोपडा हे अंतर फक्‍त 15 किलोमीटरचे आहे. मात्र, तात्पुरता पूल बंद झाल्यास हे अंतर 70 किलोमीटरचे होते. परिणामी शेतकऱ्यांना व नागरिकांचा वेळ व पैसा देखील खर्च होतो. शिवाय खेडी  भोकर, भादली, कठोरा, किनोद, गोरगावले, गाढोदे, करंज, सावखेडा आदी गावातील शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी या पुलाचा मोठा फायदा  होणार आहे. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांसह वाहनधारकांनी याठिकाणी कायमस्वरूपी पूल बांधण्यात यावा, अशी  नागरिकांची  मागणीची दखल घेऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्राधान्याने हे काम हाती घेतले आहे.

बातमीतील ठळक मुद्दे

Gulabrao Patil Tapi river