नवी दिल्ली : ‘सेबी’ने जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला (आरआयएल) एकूण ४० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. शेअर बाजारात अनियमितता केल्याच्या आरोपावरून हा दंड ठोठावण्यात आला आहे.
सन २००७मध्ये रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेडने ही अनियमितता केल्याचा ठपका ‘सेबी’ने ठेवला आहे. या प्रकरणात 'आरआयएल'वर २५ कोटी, तसेच मुकेश अंबानी यांच्यावर १५ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
हे प्रकरण रोख आणि वायदा बाजारातील शेअर खरेदी-विक्रीशी संबंधित आहे. शेअर बाजारातील अनियमिततेमुळे गुंतवणूकदारांच्या विश्वासाला तडा जातो. त्यामुळे सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात ‘सेबी’ला सर्व व्यवहारांवर बारीक लक्ष ठेवावे लागते. संबंधित व्यवहारामुळे सामान्य गुंतवणूकदारांना मोठा फटका सहन करावा लागल्याचे प्रसारमाध्यमांना आज ‘सेबी’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.