नेपथ्यनरेश नरसिंह राव..... पुष्कर लाभे , नागपूर
पंडीत नेहरू व इंदिरा गांधी औद्योगिक भारताचे शिल्पकार आहेत. ज्ञानयुगीन भारताचे शिल्पकार राजीव गांधी आहेत. तर समृद्ध भारताचे जनक माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव म्हटल्या जाते. पक्षाच्या संघटन कार्याचे ओझे कधीही न वाहता सर्वोच्च पद गाठायचे व संधीचे सोने करायचे, या नीतीकाराचे नाव म्हणजे पी.व्ही.नरसिंहराव.
तारा स्वप्रकाशित असतो व ग्रह परप्रकाशित असतो. नरसिंहराव हे पंतप्रधान होत पर्यंत ग्रहासारखे वागले व पंतप्रधान झाल्यानंतर एकदम तारा झाले. या ग्रहमालिकेने अनेक चमत्कार दिल्लीत केले. त्यास कारणही असेच होते कारण, ग्लोबल्याझेशन, प्रायव्हेटायझेन, लिबरीयझेशनचे वारे त्यावेळी या नेत्यामुळे देशात वाहू लागले. २१ मे १९९१ ला राजीव गांधींची लिट्टेने हत्या केली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले नरसिंह राव त्यावेळी केंद्रीय औद्योगिक मंत्री होते. देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा पी. व्ही नरसिंहराव यांच्याकडे आली. याच दरम्यान आर्थिक उदारणीकरण लागू करण्याचे संकेत या नेपथ्यनरेश नरसिंहराव यांनी दिले. भारत लायजनिंगमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ज्यादिवशी आर्थिक उदारणीकरणाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार होता त्यावेळी सकाळी पंतप्रधान कार्यालयात भारतातील औद्योगिकरणासंदर्भातील मोठे दस्तावेज सादर करण्यात आले होते. कंपन्या व उद्योग क्षेत्रातील सरकारी वर्चस्व कमी करून नियमावली शिथील करण्यात येणार होती. आर्थिक स्वांतत्र्य लागू करण्यात येणार होते. अर्थातच याचे श्रेय जेवढे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना जाते, तेवढेच पी.व्ही. नरसिंहराव यांना देखिल जातं. पी. व्ही.नरसिंहराव यांनी अर्थमंत्री डॉ.मनमोहनसिंग ते हर्षद मेहता यांचा वापर करून भारतीय अर्थशास्त्र ओपन केले व भारताच्या समृद्धीची प्रक्रिया ‘ट्रीगर’ केली.
अयोध्या आंदोलनातील बाबरी मश्चिद पाडण्याच्या प्रकरणात पंतप्रधान नरसिंहराव यांचा सहभाग नव्हता हे मानणे म्हणजे वेडेपणाचे लक्षण होय. विश्व हिंदु परिषदेला व संघाला बाबरी मस्जिद प्रकरण हाताळू दिले. त्याबदल्यात भाजपाची अत्यंत महत्त्वाची चार राज्ये गिळकृंत केली.
अटलबिहारी वाजपेयींना संघाचा पूर्ण पाठिंबा होता. जगाला हेवा वाटावा असा ज्ञानयुगीन व कार्यक्षम विश्वासू सहकारी त्यांना अडवाणीच्या रूपात भेटला होता. बाहेर स्नेहबंध व आत मुका संघर्ष ही वाजपेयींची खासीयत. एकाच अर्थाची वाक्ये फेकावीत ती वाजपेयींनीच. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांशी मौनव्रताच्या अस्त्राने वाजपेयी नेहमी लढले. पंतप्रधान होताच भारताला अणवस्त्रधारी राष्ट्र केले. २००३ साली भारताचा जीडीपी ग्रोथ रेट सर्वाधिक हा वाजपेयी सरकारने साध्य केला. ८.६ टक्के वृद्धीदराने भारत समृद्धीसाठी अग्रेसर झाला. चरैवेती चरैवेती हा मार्ग अवलंबन करणारे वाजपेयी यांना नरसिंहरावांनी ‘गुरूघंटाल’ असे संबोधले होते. भारताला अणवस्त्रराष्ट्र करण्यामागे व पोखरण येथे अणुस्फोट घडविण्यामागे राव यांची प्रेरणा होती, हे अटल बिहारी वाजपेयींनी नरसिहंराव यांच्या श्रद्धांजली सभेत बोलून दाखवले होते.
नरसिंह रावांनी उद्योग खाते आपल्याकडे ठेवले. त्यात आमूलाग्र बदल करता यावा हे त्यामागचे कारण होते. आर्थिक सुधारणांबरोबरच उद्योग खात्याकडेही त्यांनी तातडीने लक्ष दिले. नवीन उद्योगांच्या विकासासाठी, जुन्यांना पुनर्जीवन देण्यासाठी, ते स्पर्धेत टिकण्यासाठी त्यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्याचा रावांनी विडाच उचलला आणि एका झटक्यात ‘लायसन्स राज’ला मूठमाती दिली.
सत्तरच्या दशकात आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्री पदावरून नरसिंहराव निवृत्त झाले. पंडीत नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या मर्जीतले असलेले पी. व्ही.नरसिंहराव हे गांधी घराणेतर पहिले पंतप्रधान म्हणून केंद्रात आले. राजकीय कारकिर्दीतून संन्यास घेताना देशाचा मुकूट शिरावर चढण्याचे भाग्य त्यांच्या नशिबी होते. सीताराम केसरीनंतर त्यांच्या राजकीय कारकिर्देला सुरूंग लागला आणि ते अज्ञातवासात गेले. २३ डिसेंबर २००४ ला हृदयविकाराने त्यांची प्राणज्योत मालवली. काँग्रेसच्या यशात खारीचा का होईना पण त्यांचा वाटा लक्षणीय होता. एवढे असूनसुद्धा त्या माणसाचे पार्थिव दिल्लीच्या काँग्रेस मुख्यालयात आणण्यास सोनिया गांधींनी विरोध केला. ज्या माणसाने डॉ. मनमोहनसिंग यांची एक वेगळी ओळख जगाला दाखविली तो व्यक्ती दहा वर्षे पंतप्रधान असताना देखिल पी.व्ही.नरसिंहराव यांना भारतरत्न देऊ शकला नाही, ही खरी शोकांतिका आहे.
सामान्य माणसाला किंवा व्यक्तीला नरसिंहराव यांना जाणून घेण्यासाठी आपल्याला काँग्रेसचा चेहरा का बघावा लागतो? काँग्रेसला नरसिंहराव यांच्या कार्याचा विसर का पडला? नरसिंहराव हे भारताचे खरे रत्न नव्हते का? दोन माजी पंतप्रधानांचे (अटल बिहारी वाजपेयी आणि डॉ.मनमोहन सिंग) राजकीय गुरू असून देखील त्यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान देण्याचे धाडस या नेत्यांनी का नाही दाखवले?
मी नरसिंहराव यांची कारकिर्द पाहिली नाही. त्यांचा माझा संपर्क कधीही आला नाही. नरसिंह राव पंतप्रधान असताना मी नुकताच जन्मास आलो होतो. माझ्या राजकीय संकूचित व सिमीत राजकारणाच्या अभ्यासानूसार पी.व्ही.नरसिंह राव हे भारतरत्नासाठी पात्र आहे, असे मला वाटते. आज पी.व्ही.नरसिंह राव यांची जयंती त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!